कुंड धरण ओव्हरफ्लो होताच गोरक्षगंगा नदीला पूर : सतर्कतेचे आमदार एकनाथराव खडसेंचे आवाहन
कुर्हा गावातील पूल पाण्याखाली ; गावाचा तुटला संपर्क
Gorakshganga river floods as Kund dam overflows : MLA Eknathrao Khadse’s call for vigilance
मुक्ताईनगर : गेल्या दोन दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. जोंधनखेडा येथे सातपुड्याच्या पायथ्याशी गोरक्षगंगा नदीवर असलेले कुंड धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोरक्षगंगा नदीला पूर आला आहे. गोरक्षगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुर्हा येथे पूर परीस्थिती निर्माण झाल्यानंतर कुर्हा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला आहे.
नागरीकांनी बाळगावी सतर्कता : आमदार खडसे
माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे व अॅड.रोहिणी खडसे यांनी कुर्हा येथे भेट देत परीस्थितीची पाहणी केली. प्रशासन आणि नागरीकांसोबत चर्चा केली. आमदार एकनाथराव खडसे यांनी पुलावरून पाणी वाहत असताना नागरीकांनी पूल ओलांडू नये व सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठच्या लोकांनी विशेष खबरदारी घेत सुरक्षित स्थळी जावे सतर्क राहावे , घाबरून जावू नये कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.

प्रशासनाकडून पंचनाम्यांचे आदेश
प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे तहसीलदार निकेतन वाढे यांनी यंत्रणेला आदेश दिले. यावेळी माजी सभापती विलास धायडे, निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, सरपंच डॉ.बी.सी.महाजन, उपसरपंच अनिल पांडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद सोनवणे, डॉ.गजानन खिरळकर, युवराज माहूरकर, अरुण वसतकार, विशाल रोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, गावातील नागरीक उपस्थित होते.
