नागपूरातील व्यापार्याने गेमच्या आहारी गमावले 58 कोटी ; बुकीच्या घरातून 18 कोटींच्या रोकडसह 15 किलो सोने जप्त
Nagpur businessman loses 58 crores to game ; 15 kg gold along with 18 crores cash seized from bookie’s house गोंदिया : नागपुरातील व्यापारी मित्राची ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटी रुपयांनी फसवणूक झाल्यानंतर नागपूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी व बुकीच्या गोंदियातील घरात धाड टाकून 18 कोटी रोख, 15 किलो सोने आणि 200 किलो चांदी जप्त केल्याने राज्यात खळबळ उडाली. ऑनलाईन तीन पत्ती, रमी आणि कसिनो अशा गेममध्ये पैसे लावल्यास दररोज लाखोंचा फायदा करून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आल्याने या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे. अनंत उर्फ सोन्टू नवरतन जैन (रा. गोंदिया) असे गुन्हा दाखल झालेल्या बुकीचे नाव आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.
अशी झाली फसवणूक
2021 मध्ये पीडित व्यापार्याने गेममध्ये पाच लाख रुपये लावले. त्याला काही तासातच आठ लाख रुपये मिळाले. आरोपी जैनने मित्राला जास्त रक्कम लावण्यास प्रोत्साहित केले. 5 ते 10 लाख रुपये लावल्यास लगेच 15 ते 18 लाख रुपये मिळत होते तर एक कोटींची रक्कम लावल्यास ऑनलाईन गेममध्ये हरवून पैसे उकळले जात होते. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी अनंत जैन पळून दुबईत गेल्याची चर्चा आहे.





