भुसावळातील तीन लाखांचे लाच प्रकरण : बाजारपेठ पोलीस निरीक्षकांसह तिघांच्या जामिनावर 26 रोजी निर्णय


Three lakh bribe case in Bhusawal: Decision on bail of three including market police inspector on 26 भुसावळ : बायोडिझेल प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती तीन लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस नाईक तुषार पाटील व ऋषी शुक्ला यांच्या जामिनावर बुधवार, 26 रोजी निर्णय होणार आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पोलीस निरीक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर भुसावळातील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील दोघांविरोधात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर याच प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराच्या मित्राकडे भुसावळातील ऋषी शुक्ला यांनी पाच लाखांची लाच मागून तीन लाखात तडजोड केल्याचा आरोप असून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व तुषार पाटील यांच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवार, 18 जुलै रोजी भुसावळ-बोदवड रस्त्यावरील विचवा गावाजवळ ऋषी शुक्ला यांना दुपारी तीन लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्यांना अटक केली व लाच प्रकरणात बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व नाईक तुषार पाटील यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांनादेखील मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली.

तिघांच्या जामिनावर आता 26 रोजी निर्णय
लाच प्रकरणातील तीन्ही संशयितांना बुधवार, 19 जुलै रोजी एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी एसीबीने सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलीस निरीक्षक गायकवाड यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना भुसावळातील ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले तर तुषार पाटीलसह ऋषी शुक्ला यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सोमवार, 24 रोजी भुसावळ सत्र न्यायालयात तक्रारदारातर्फे अ‍ॅड.मुकेश शिंपी यांनी जामिनावर हरकत नोंदवत काही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकत आता बुधवार, 26 जुलै जामिनावर निर्णय देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर आता सुनावणीकडे लक्ष लागले आहे. तीन्ही संशयितातर्फे अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.तुषार पाटील व अ‍ॅड.बी.ए.पाटील यांनी बाजू मांडली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !