भुसावळात स्वच्छतेला ‘खो’ : नगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांसह नऊ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा

प्रशासक अ‍ॅक्शन मोडवर : स्वच्छता करणार्‍यांच्या प्रभागात अस्वच्छता आढळल्याने आश्चर्य


Bhusawal ‘lose’ cleanliness : show cause to nine employees, including municipal health officers भुसावळ : भुसावळ पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास खाजगी कार्यक्रमाला जाताना अस्वच्छता आढळल्यानंतर त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांसह स्वच्छता मुकादमाला धारेवर धरत त्यांच्यासह स्वच्छता कर्मचार्‍यांना जागीच नोटीसा बजावण्याचे आदेश पालिका उपमुख्याधिकार्‍यांना बजावले. या कारवाईने पालिकेतील स्वच्छता कामगारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वी प्रशासकांनी धडक कारवाई केल्याने प्रशासकांच्या कारवाईचा धसका स्वच्छता कर्मचार्‍यांनी घेतला आहे. शहरात अनेक भागात अस्वच्छता असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत तर लाखो रुपये खर्चूनही अस्वच्छता दिसून येत असल्याचा प्रत्यय खुद्द प्रशासकांना आल्यानंतर त्यांनी यंत्रणेला धारेवर धरत संताप व्यक्त केला तसेच बुधवारपासून शहरातील विविध भागात सरप्राईज व्हिजीट देत स्वच्छतेचा आढावा घेण्याचे सूतोवाचही केले.

अस्वच्छता पाहून प्रशासक संतप्त
शहरातील जैन श्रावक संघात पर्युषण पर्व सुरू असून या कार्यक्रमासाठी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील हे गेले होते. कार्यक्रमास भेट दिल्यानंतर बाहेर पडताना त्यांना परीसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली तसेच जामनेर रोडवरील वाल्मीक नगर भागातही हाच प्रकार त्यांच्या नजरेस पडल्यानंतर दिवसभरात स्वच्छताच केली गेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासकांचा पारा चढला. विशेष म्हणजे वाल्मीक नगर भागात पालिकेचे मोठ्या संख्येने सफाई कामगार वास्तव्यास आहेत. सफाई करणार्‍यांचा प्रभागातच अस्वच्छता दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. प्रांतांनी संबंधित भागातील आरोग्य अधिकारी, स्वच्छता मुकादम व स्वच्छता कर्मचार्‍यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालिका उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांना दिले.

या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना बजावली नोटीस
खास सूत्रांच्या माहितीनुसार, स्वच्छता निरीक्षक वसंत चेनसिंग राठोड, आरोग्य अधिकारी प्रदीप देविदास पवार, मुकादम मनोहर नारायण खरारे व महेश भगवान चव्हाण, सफाई कामगार नरेंद्र किसन बागरे,
प्रथम सुनील पंडीत, रणजीत ईश्वर चंडाले, जय श्रावण बोयत, संजू मन्सा खरारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

आरोग्य निरीक्षकांसह मुकादमांचा पगार कापला : प्रांताधिकारी
शहरात अस्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. कार्यक्रमाला जाताना मला स्वच्छता अस्वच्छता असल्याचे दिसून आल्याने संबंधितांना नोटीसा बजावण्याच्या सूचना केल्या आहेत. दिवसभरात या भागात कचरा उचलण्यात आला नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. कामात कसूर करणार्‍या आरोग्य निरीक्षक व मुकादम यांचा एका दिवसाचा पगार कट करण्याच्या सूचना केल्या आहेत शिवाय संबंधितांसह सफाई कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, आता बुधवारपासून शहरातील विविध भागात आपण सकाळी व दुपारी व सायंकाळी सरप्राईज व्हिजीट देणार आहेत. नालेसफाईचा विषय असो अथवा अस्वच्छतेचा दोषी कुणीही कारवाई निश्चित होईल शिवाय दोषी आढळणार्‍या आरोग्य निरीक्षकांचा दरवेळी पगार कापण्यात येईल, असा इशारा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !