गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ यावलला सर्वपक्षीय मूक मोर्चा
An all-party silent march was held to protest the Gondgaon incident यावल : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा यावल येथील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध करण्यात आला तसेच या घटनेच्या निषेर्धात मूक मोर्चा काढण्यात आला. अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. अटकेतील संशयित आरोपीला न्यायालयाने कठोरात-कठोर कारवाई करावी, अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन
यावल तालुका खरेदी-विक्री संघाचा परीसर ते यावल तहसील कार्यालयापर्यंत मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मूक मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरीक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीकांनी चिमुकल्या अल्पवयीन मयत झालेल्या मुलीला यावेळी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शेखर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम.बी.तडवी, ठाकरे गटाचे अजहर खाटीक, रीपाईचे तालुकाध्यक्ष विष्णू पारधे यांच्यासह मोठ्या संख्येत महिला भगिनी व चिमुकल्या मुली यांनी या मूकमोर्चात सहभागी झाले तसेच अत्याचारास बळी गेलेल्या मुलीला न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
