बोदवडला उद्घाटनापूर्वीच रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला : राजकीय चढाओढीची जनसामान्यांमध्ये चर्चा

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात विविध रेल्वे गाड्यांना थांब्यांसाठी बोदवड रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन


Railway flyover open for traffic before Bodwadla inauguration: Public debate on political battle बोदवड : बोदवड रेल्वे स्थानकावर यापूर्वी थांबा असलेल्या सुरत-अमरावती, सेवाग्राम-दादर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी क्रांतीदिनी बुधवार, 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय दिव्यांग संघटनेकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता आंदोलक रेल्वे स्थानकावर आले मात्र यावेळी रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने त्यांचा हिरमोड झाला तर आमदार चंद्रकांत पाटील आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात रेल्वे गेटजवळ शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, काम पूर्ण होवूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक अडथळा बाजूला सारून आमदार पाटील यांनी सुरू केली तर काही वेळेनंतर रेल्वे प्रशासनाने वाहतूक थांबवल्यानंतर पुन्हा आमदारांनी स्वतः येत वाहतूक सुरू केल्याने राजकीय चढा-ओढाची चर्चाही रंगली.

आंदोलकांना प्रवेशद्वाराजवळ रोखले
क्रांतीदिनी बुधवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता बोदवड रेल्वे स्थानकावर आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर व्यापारी संघटना, फर्टिलाईझर संघटना, खान्देश प्रवासी संघ, बोदवड प्रवासी संघटना, सराफ असोसिएशन, डॉक्टर सेल तसेच आमदार चंद्रकांत पाटील हे दाखल झाले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाला सुरक्षा कडे करीत यावेळी कुणालाही स्थानकात शिरू देण्यास मज्जाव केला तसेच परीसराला पूर्णपणे बॅरीकेटींग केले.

तिकीटानंतरही दिला नाही प्रवेश
शेकडोच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांना सुरक्षा बलाने गेटवरच रोखून धरले तर आंदोलकांनी आम्ही लोकशाही मार्गाने रेल्वे तिकीट घेतल्याने आम्हाला रीतसर आतमध्ये जावू देण्याबाबत विनंती केली मात्र रेल्वे प्रशासन आंदोलकांना जुमानले नाही तर ज्या प्रवाशांना नांदुरा, शेगाव व अकोला जावयाचे होते त्यांना सुद्धा आत जावू देण्यास मज्जाव करण्यात आला तसेच तक्रार रजिस्टरवरदेखील तक्रार नोंदवू दिली नाही. रेल्वे स्थानक पूर्णपणे निकामी करून आतमध्ये प्रवाशांना जावू देण्यास मनाई करण्यात आल्याने प्रवाशांनी या कृतीचा तीव्र संताप व्यक्त केला.

आमदार म्हणाले, थांबा न दिल्यास पुन्हा आंदोलन
सकाळी आमदार चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह आल्यानंतर त्यांनी रेल्वेचे वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अरुणकुमार पाठक यांना जाब विचारात तुम्ही आंदोलनकर्त्यांना तिकीट असताना रेल्वे स्थानकात जावू देत नाहीत, त्यांच्या हक्काच्या गाड्या देत नाही मग त्यांनी काय करावे? असा प्रश्न केला शिवाय प्रवाशांनाही रेल्वे स्थानकात प्रवेश न दिल्याने त्यांच्या गाड्या निघून गेल्याने त्यांची गैरसोय झाल्याचे सांगितले. तुम्हाला जर लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यायचे नसेल आणि त्यांच्या हक्काच्या रेल्वे थांबे देत नसाल तर मी हजारो नागरीक व कार्यकर्ते आणून आंदोलन करेल, असा इशारा देत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कृतीचा संताप व्यक्त केला.

आमदारांनी खुला केला उड्डाणपूल
रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यास विरोध केल्यानंतर आमदारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना घैवून मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील रेल्वेगेटजवळ पुन्हा आंदोलन केले. यावेळी आमदारांनी बोदवड-मुक्ताईनगर रेल्वे गेटवर बनवलेल्या उड्डाणपूलला अजून किती दिवस उद्घाटनाला लावणार? वाहनधारक व वाहनधारकांना वेठीस धरणार? असे म्हणत जेसीबीद्वारे उड्डाणपुलावरील साहित्य बाजूला करीत वाहतूक खुली केली. काही वेळ वाहतूक चालल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा वाहतूक थांबवली व ही बाब आमदारांना कळताच त्यांनी पुन्हा उड्डाणपूलावर येत वाहतूक खुली केली. यावेळी अरुण कुमार यांना मागण्यांचे निवेदन देत थांबे सुरू न केल्यास 15 ऑगस्ट रोजी पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला. आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांना रेल्वे स्थानकापर्यंत मोफत रीक्षा युनियनकडून देण्यात आल्या तर आंदोलन कर्त्यासाठी सामूहिक वर्गणी करत एक हजार प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील, धनराज गायकवाड, व्यापारी संघटनेचे गोपाल अग्रवाल, विकास कोटेचा, सुरेश वर्मा, बिहारीलाल आहुजा, डॉ.चंद्रकांत जैन, नाडगाव सरपंच, मिलिंद बडगुजर, डॉ.संदीप जैन, शामलाल लुंढ यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !