नागपूरच्या कापड व्यापार्याला भुसावळात मारहाण करीत लुटले
A cloth merchant of Nagpur was beaten and robbed in Bhusawal भुसावळ : नागपूर येथील कापड व्यापार्याला शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कारला कट मारल्याचे निमित्त करीत बेदम मारहाण करीत 34 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता घडली. याप्रकरणी व्यापार्याने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघा संशयितांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा
किशोर रामेश्वर सदावर्ते (31, न्यू डायमंड नगर, प्लॉट नंबर 12, नागपूर) हे व्यापारी असून ते मित्रासह कारने सुरत येथे कपडे खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात कारने दोघे नागपूरकडे निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल तनारीकासमोरील उड्डाण पुलावर व्यापार्यांच्या चारचाकीला कट मारून त्रिकूटाने अडवले व दोघांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर व्यापारी व त्यांचा मित्र हादरले. यावेळी व्यापार्याच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची व 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व चार हजार रुपये किंमतीचे व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व पाचशे रुपये किंमतीची कापडी बॅग (ज्यात एटीएम, आधारकार्ड, लायसन्स होते) संशयितांनी हिसकावून पोबारा केला. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आवहाड यांंनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.








