जळगावात डॉक्टरांना मारहाण करणे भोवले : महिला पोलिस कर्मचार्याचे निलंबन
Doctor beaten up in Jalgaon : Suspension of female police officer जळगाव जळगाव शहरातील डॉक्टरांना मारहाण करीत पोलिस असल्याची बतावणी करणार्या महिला पोलिसाचे जळगाव पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबन केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. कायद्याचे पालन करणार्या महिला कर्मचार्यानेच कायदा हातात घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून महिला कर्मचार्याची आता विभागीय चौकशी करण्यात येत आहे. शिल्पा राठोड असे निलंबित पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
डॉक्टरांना मारहाण भोवली
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परीसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे रविवार, 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ.नीरज चौधरी यांना जळगाव हर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिल्पा राठोड यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता काढण्यात आले असून राठोड यांची विभागीय चौकशीदेखील होणार आहे.


विभागीय चौकशी होणार
डॉ.नीरज चौधरी हे रविवार, 29 ऑक्टोबर रोजी सकाळी नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने आले होते. त्या ठिकाणी कार लावण्यावरून वाद झाला व दोन नारळ विक्रेत्यांनी डॉक्टरची कॉलर पकडून व त्यांच्या सहकार्यांवर कोयता उगारला होता. त्यानंतर त्या ठिकाणी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी शिल्पा राठोड या तेथे आल्या व त्यांनी डॉ.नीरज चौधरी यांना मारहाण केली होती. या प्रकरणी डॉ.नीरज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चचार वाजता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस कर्मचारी शिल्पा राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले.