मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश ! जळगावात ईएसआयसी रुग्णालयाची लवकरच उभारणी
रुग्णालयांसाठी एमआयडीसीने उपलब्ध करून दिला भूखंड ः जळगाव एमआयडीसीच्या 5425 चौरस मीटर जागेत साकारणार रूग्णालय !
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (ईएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसी क्षेत्रात अवघ्या एक रुपया चौरस मीटरमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे या रुग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागणीला सकारात्मक प्रतिसाद
जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामागारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर 2023 महिन्यात जागेचा शोध घेतला. यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागांची पाहणी करून रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक 21694 मध्ये रूग्णालयासाठी 5425 चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाचा शास नपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने रूग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटर प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्ताव ही दिला आहे.


पाठपुराव्याला यश : जिल्हाधिकारी
राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रूग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय ईएसआयसी रुग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, ईएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे., अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.





