बनावट जन्मदाखल्याद्वारे शासनाची फसवणूक : कासोद्याच्या मुख्याध्यापिकेला तीन वर्ष शिक्षा


Cheating the government through fake birth certificate : Kasoda headmistress gets three years sentence एरंडोल : सेवानिवृत्तीनंतरचे अधिक लाभ मिळण्यासाठी शासनाकडे खोटा दाखवला सादर करून सेवानिवृत्तीचे वय वाढवल्याप्रकरणी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील यांना जामनेर न्यायालयाने त्यांना तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

असे आहे फसवणूक प्रकरण
महानंदा भावराव पाटील या नियम व वयोमानानुसार 2015 मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या परंतु त्यानंतरही त्यांनी सेवेत कायम हजर राहून शासकीय लाभ प्राप्त करण्याच्या गैरहेतूने प्रतिज्ञापत्रात जाणीवपूर्वक खोटी जन्मतारीख नमूद केली. जन्म दाखला त्यांनी जामनेरचे तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून प्राप्त केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी शिक्षण संस्थेने जामनेर येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची सुनावणी तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी घेऊन पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी जामनेर न्यायालयासमोर झाली.



साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड.कृतिका भट यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यात नरेंद्र भिकनराव पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असून शासनाची दिशाभूल करणारा आहे, असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामनेर न्यायालयाने मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील यांना दोषी धरत तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्या.दि.न.चामले यांच्या न्यायासनासमोर खटल्याचे कामकाज झाले. खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.रवींद्रसिंह देवरे व अ‍ॅड.अनिल सारस्वत यांनीही काम पाहिले. तर त्यांना अ‍ॅड.प्रसन्न पाटील यांनी सहकार्य केले. तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते तर न्यायालयात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार चंद्रकांत बोदडे व पोलिस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !