एरंडोलनजीक भरधाव ट्रकने कट मारल्याने वेल्हाणे गावातील युवक जागीच ठार
A youth of Velhane village was killed on the spot after being hit by a speeding truck near erandol एरंडोल : भरधाव ट्रकने कट मारल्यानंतर झालेल्या अपघातात धुळे तालुक्यातील वेल्हाणेतील युवक ठार झाला. हा अपघात खडके खुर्दपासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोल-कासोदा रस्त्यावर रविवारी दुपारी साडेतीन वाजेपूर्वी घडला. अरुण काळू मराठे (39, रा.वेल्हाणे, ता.धुळे) असे मयताचे नाव आहे.
ट्रकच्या धडकेने युवक ठार
एरंडोलकडून भडगावकडे अनिल पाटील व अरुण मराठे हे दोघे दुचाकी (एम.एच. 18 बी.डब्ल्यू.1836) ने अरुण मराठे यांच्या नातेवाईकांच्या लग्नात जळगाव येथे गेले. लग्नाला हजेरी लावून साधारणपणे दीड वाजेच्या सुमारास ते अनिल पाटील यांच्या वलवाडी, ता.भडगाव येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर भडगावकडून येणारी भरधाव ट्रक (एम.एच.18 बी.जी.3240) ने कट मारला. त्यामुळे मागे बसलेला अरुण मराठे हा रस्त्यावरून खाली फेकला गेला व ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. या दुर्घटनेत अनिल पाटीलसुद्धा जखमी झाला आहे.


याप्रकरणी एरंडोल पोलिसात रविवारी रात्री उशिरा ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एरंडोल पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास देशमुख, किरण पाटील करीत आहेत.
