अजिंठा लेणी परिसरातील जंगलात मृतदेह सापडला
The dead body was found in the forest near Ajantha Caves सोयगाव : अजिंठालेणी परिसरातील कालिंका माता मंदिरा जवळील राखीव जंगलात अंदाजे 65 ते 70 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी सापडला. या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटलेली नसून सदरील व्यक्तीचा मृत्यू दीड ते दोन महिन्यापूर्वी झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अज्ञाताने घेतला गळफास
बुधवारी सकाळी अजिंठा लेणी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात वनकर्मचारी गस्त घालीत असतांना येथील कालिंका देवी मंदिर परिसरातील पूर्वाश्रमीच्या आरोरा आश्रमा पाठीमागील राखीव जंगलात त्यांना अंदाजे 65 ते 70 वर्षाच्या व्यक्तीचा सांगाडारुपी मृतदेह झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लोंबकळत असल्याचे दिसून आले.


या पार्श्वभूमीवर वनकर्मचार्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भरत मोरे, निलेश लोखंडे, योगेश कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान या व्यक्तीच्या अंगात पांढर्या रंगाची बंडी व धोतर असा पोषाख असून मृतदेहाच्या बाजूला पांढर्या रंगाचा सदरा, चॉकलेटी रंगाचा बुटाचा जोड व पांढर्या रंगाचे दोन रुमाल सापडले.
मृतदेहाचा केवळ सांगडा उरला असल्याने व ओळख पटेल असा कोणताही पुरावा घटनास्थळी सापडला नसल्याने अद्यापपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सदरील व्यक्ती बाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक निरीक्षक भरत मोरे यांनी केले आहे.
