पाचोर्यानजीक हिट अॅण्ड रनचा थरार : कारच्या धडकेने विद्यार्थिनीसह दुचाकीस्वाराचा मृत्यू
Thrill of hit and run near Pachora : Cyclist dies along with student after being hit by car पाचोरा : पाचोरा शहरानजीक भरधाव कारने उडवल्याने विद्यार्थिनीसह दुचाकीस्वाराचा मृत्यू ओढवला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी गोराडखेडा गावाजवळ घडला. या अपघातात सुभाष रामभाऊ पाटील (60) व पी.के.शिंदे विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी दुर्वा भागवत पवार ठार झाली. अपघातानंतर संतप्त जमावाने आरोपींना ताब्यात देण्याची मागणी पाचोरा ठाण्याबाहेर येत केली.
भरधाव चारचाकीने उडवले
भरधाव चारचाकी पाचोर्याहून जळगावकडे भरधाव वेगाने जात होती. दरम्यान शिंदे हायस्कूलमधून दोन विद्यार्थिनी घरी जात होत्या. यावेळी भरधाव वेगात येणार्या चारचाकीने गोराडखेडाजवळ या विद्यार्थिनीसह रस्त्यावरुन जाणार्या इतर लोकांना जोराची धडक दिली. यामध्ये विद्यार्थिनी दुर्गा भागवत पवार (15) आणि सुभाष पाटील (60) हे जागीच ठार झाले तर विद्यार्थिनी ऋतुजा राजेश भोयटे (पाटील) आणि परशुराम पाटील हे जखमी झाले. जखमींवर पाचोरा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत.


संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कारमधील सर्वजण जळगाव येथील असल्याची माहिती आहे. या प्रकरणी तपास करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी राहुल खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर महिला कर्मचारी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जमावाला शांत करता आले. तसेच अधिकारी व कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी घेतलेल्या निर्णयामुळे पुढील अनेक घटना टळल्या.
