संतापजनक : तक्रार घेवून आलेल्या महिलेकडे हवालदाराने केली शरीरसुखाची मागणी


अकोला : पोलीस ठाण्यात फिर्याद घेऊन आलेल्या महिलेला न्याय देण्याऐवजी तिचेकडे थेट शरीर सुखाची मागणी एका पोलिस हवालदाराने केली. याप्रकरणी महिलेने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेताच हवालदाराविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याचे निलंबनही करण्यात आले. हवालदार बाळकृष्ण येवले, असे संशयित आरोपीचे नाव आहे.

विवाहित महिलेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क !
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या कुटुंबासोबत गावातील एका व्यक्तीचा वाद झाला. वादाची तक्रार देण्यासाठी विवाहितेने पतीसोबत चान्नी पोलीस स्टेशन गाठले. तक्रारीनंतर आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले याने विवाहितेच्या पतीला बाजूला थांबवून, तू मला आवडते, मी तुला फोनवर सांगतो काय करायचे आहे, असे म्हटले. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी याने 22 एप्रिल रोजी पती-पत्नीला ठाण्यात बोलावून प्रतिबंधात्मक कारवाईबाबत समजपत्र दिले, त्यानंतर विवाहित महिलेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून अश्लिल संभाषण करून मानसिक त्रास दिला. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी 23 एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि दार बंद केले. विवाहितेचा विनयभंग करीत त्याने शरीर सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे 6 मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे. तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांच्या विरुध्द 11 मे रोजी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांनी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली.

पोलीस अधीक्षकांकडून तातडीने निलंबन !
पोलीस वर्दीची प्रतिमा मलीन करणार्‍या आरोपी बाळू विठ्ठलराव येवले या वादग्रस्त अंमलदारास शनिवारी तातडीने निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवारी सायंकाळी चान्नीचे ठाणेदार यांना लेखी आदेश पाठवून तातडीने निलंबित केले. यादरम्यान कोणतेही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. पोलिसांच्या ब्रीद वाक्याला काळीमा फासल्याचेही आदेशात नमूद आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !