बीड आर्थिक गुन्हे शाखेचा निरीक्षक खाडेच्या घरात सापडले 1.85 कोटींचे घबाड

970 ग्रॅम सोने, 5.5 किलो चांदीचा समावेश : पाच लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा


Inspector of Beed Economic Offenses Branch found 1.85 crores of money in Khade’s house बीड : पोलीस दलातील लाचखोरी नवीन नाही. ‘सापडला तो चोर’ या उक्तीचा अनुभव सर्वसामान्यांना नेहमीच नेतो. बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याविरोधात पाच लाखांच्या लाच प्रकरणात गुन्हा दाखल होताच ते पसार झाले तर एसीबीने न्यायालयाच्या आदेशानंतर केलेल्या छापेमारीत मात्र त्यांच्या घरातून एक कोटी आठ लाखांची रोकड, 72 लाख रुपयांचे 970 ग्रॅम सोने, 4 लाख 62 हजार रुपये किमतीची साडेपाच किलो चांदी असा एकूण 1 कोटी 85 लाखांचा ऐवज जप्त केला. आरोपी निरीक्षक खाडेच्या नावावर बारामती- इंदापूरमध्ये प्रत्येकी एक फ्लॅट, इंदापूरमध्ये व्यापारी गाळा, तसेच बारामती व परळीत दोन प्लॅट असलेली कागदपत्रेही पथकाने जप्त केली.

असे आहे लाच प्रकरण
बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत गतवर्षी सुमारे 100 कोटींचा घोटाळा झाला होता. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण 4 गुन्हे नोंद असून याचा तपास खाडे याच्याकडे होता. याप्रकरणी अनिता शिंदे अटकेत असून इतर फरार आहेत. बबन शिंदे याने दोन व्यावसायिकांना बांधकामचे साहित्य पुरवल्यापोटी 60 लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून, खाडे याने दोघांकडे प्रत्येकी 50 लाख रुपये लाच मागितली होती तर 30 लाखांत तडतोड झाली होती. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हफ्ता गुरुवारी कापड व्यापारी कुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्यावतीने घेतला होता. लाच रक्कम मिळताच एसीबीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात कुशाल प्रवीण जैन यास पैसे घेताना बुधवारी अटक झाली होती, तर पोलीस निरीक्षक खाडे व सहायक फौजदार रविभूषण जाधवर फरार असून दोघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले.

फौजदाराच्या घरात 25 तोळे सोने
सहायक फौजदार जाधवर याच्या घराची बुधवारी रात्रीच झडती घेतली. तिथे 15 हजार रुपयांची रोकड आणि 25 तोळे सोने सापडले. दरम्यान, खाडेचा सहायक व्यापारी कुशाल प्रवीण जैनला न्यायालयाने गुरुवारी 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !