रावेर वनक्षेत्रात अनुभवता येणार प्राण्यांच्या हालचाली
बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गानुभव : वन्यप्राणी प्रगणनेच्या तयारीला वेग
रावेर : बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या 23 मे रोजी बुध्द पौर्णिमा येऊ घातली आहे. त्यानिमित्ताने होणार्या प्राणी प्रगणनेच्या तयारीला प्रादेशिक वनविभागाने गती दिली आहे. तसे पाहता वन्यप्राणी प्रगणनेच्या विविध पध्दती असून त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमेर्याद्वारे देखील गणना होते. मात्र नवखे निसर्गप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांना संपूर्ण रात्र जंगलात काढून त्याचा थरारक अनुभवता लुटता यावा, त्यासोबतच दर्शन देणार्या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणून रावेर वनक्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या वतीने निर्सग अनुभवाचे आयोजन केले जाते.
मचाण उभारणीला वेग
जिल्ह्यातील रावेर वनक्षेत्रात निसर्ग अनुभव उपक्रमासाठी तयारीला वेग आला आहे. वनक्षेत्रात पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुध्द पाणीपुरवठा करणे, पाणवठ्याशेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरू आहेत. रावेर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या रावेर वनक्षेत्र प्रादेशिकमध्ये एकूण 11 मचाण यंदा निसर्ग अनुभवासाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंजन, मोर, चिकारा असे मचान तयार करण्यात आले आहेत. यापैकी सात मचाणांची ऑनलाईन बुकींग निसर्गप्रेमींना करता येणार असून चार पाणवठे राखीव ठेवण्यात येणार आहेत.


हे प्राणी हमखास आढळतात
रावेर वनक्षेत्रात निसर्गप्रेमींना मुख्यत्वे वाघ, बिबट, अस्वल, तडस, कोल्हा यासह चितळ, भेडकी, सायाळ, निलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षी सरीसृप यांचाही आढळतात. सातपुडा जंगल सफारीच्या दरम्यान जवळच वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभव देते.
लवकरच करता येणार नोंदणी
रावेर वनक्षेत्रात पाणवठ्यांची साफसफाई, मचाण निर्मिती इतर सर्वच कामांना वेग देण्यात आला आहे. निसर्गप्रेमींना पर्यावरणपूरक जंगल सफारी मार्गाचा सुध्दा चांगला अनुभव घेता यावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत. साधारपणे बुध्द पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 10 वाजता पाल पार्क निसर्ग परिचय केंद्र येथे एकत्रीकरण होईल त्यानंतर नोंदणी, दुपारचे भोजन करून दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण आपापल्या मचाणांकडे मार्गस्थ होतील. याकरीता यावल वन विभाग, जळगाव येथे ऑनलाईन बुकींग करणे आवश्यक असून लवकरच नोंदणीला वेबसाईटवरुन प्रारंभ होईल, असे रावेर-यावल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे म्हणाले.