भुसावळातील दुहेरी हत्याकांड : करन पथरोडला नाशिकमधून अटक


Bhusawal double murder : Karan Pathrod arrested from Nashik भुसावळ : भुसावळातील माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांची बुधवारी रात्री शहरातील जुना सातारा भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामधील संशयीत करन पथरोड (20, रा.भुसावळ) यास नाशिक आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने नाशिकच्या भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील द्वारकानजीक बोहरी पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून गुरुवारी रात्री 11 वाजता अटक केली. संशयीताकडून दोन गावठी कट्टे, मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

गस्तीदरम्यान संशयीत जाळ्यात
भुसावळ शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी स्वीप्ट कारमधून आलेल्या बारसे व राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. हल्लेखोरांनी त्यानंतर भारत नगरात बेछूट गोळीबार करीत पळ काढला होता. दरम्यान, नाशिकमधील गुंडाविरोधी पथक शहरात रात्रीची गस्त करत असताना भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील द्वारकानजीक बोहरी पेट्रोल पंपाजवळ संशयीत गवसल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या अंग झडतीत दोन गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, प्रदीप चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक
भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसेंसह सुनील राखुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत तथा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना साक्री तालुक्यातील दहिवेल जवळून साक्री पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली होती तर दुसरा संशयीत विनोद चावरीया यास स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी वाल्मीक नगर भागातून अटक केली आहे तर अन्य संशयीत मात्र पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !