1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून


कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (70) याचा खून झाला आहे. पाच कैद्यांनी ड्रेनेजचे लोखंडी झाकण डोक्यात टाकून गुप्ताचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील आंघोळीच्या हौदावर घडली.

पाच आरोपींविरोधात गुन्हा
याप्रकरणी कारागृहातील न्यायालयीन बंदी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध या पाच जणांची चौकशी जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे.



जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मुन्ना
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवारी सकाळी तो आंघोळीसाठी कारागृहातील हौदावर गेला. त्याठिकाणी आधीच थांबलेल्या कैद्यांसोबत त्याचा वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. त्यावेळी न्यायालयीन बंदी प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध यांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकण काढून खान याच्या डोक्यात घातले. वर्मी घाव लागल्याने खान जागेवरच कोसळला.

कळंबा कारागृह पुन्हा ऐरणीवर
गेल्या दीड ते दोन महिन्यात शंभराहून अधिक मोबाइल सापडल्याने कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिका-यांनी विशेष तपासणी मोहिम राबवून 11 कर्मचार्‍यांसह दोन अधिकार्‍यांना बडतर्फ केले, तर दोन अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्यानंतरही कळंबा कारागृहातील गैरप्रकार थांबलेले नाहीत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !