पाल येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू
रावेर : शेतात काम करीत असतांना एका युवकाचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला. ही घटना रावेर तालुक्यातील पाल येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीताराम गोरेलाल पवार (24) असे मयताचे नाव आहे.
शेतात काम करताना सर्पदंश
सीताराम हा मोरव्हाल रस्त्यावरील शिवपट्टी भागातील स्वतःच्या शेतात काम करीत असताना रविवार, 14 रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या तोंडातून फेस निघत होता. त्याच्या डाव्या हाताच्या कोपर्याला सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यास पाल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून सीताराम यास मृत घोषित केले. याबाबत गणेश पवार यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉस्टेबल विष्णू भील करीत आहेत .

