मनवेल शेत शिवारातून विद्युत वितरण कंपनीचे तार लांबवले
यावल : मनवेल शेत-शिवारातील शेत गट क्रमांक 276 पासून ते अनिल श्रावण पाटील यांच्या शेत गट क्रमांक 282 पर्यंत राज्य विद्युत वितरण कंपनीने 24 खांब टाकून त्यावर शेतकर्यांच्या शेती पंपासाठी कनेक्शन देण्याकरिता लघू
दाबाचे तार टाकले होते. या 24 खांबावरील 74 हजार 441 रुपये किंमतीचे पाच हजार 520 मीटर लांबीचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले.
चोरीदरम्यान एक खांब शेतात कोसळून नुकसान झाले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. शेतकर्यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या साकळी कक्षाला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी अधिकारी वर्गांनी पाहणी केली व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात साकळी कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

