मोहराळा शेत शिवारातून विद्युत वितरण कंपनीचे लघू दाबाचे तार चोरी
यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्र अंतर्गत असलेल्या मोहराळा शेत शिवारातून लघू दाबाचे तार चोरी झाले. शेत गट क्रमांक 472 ते 475 दरम्यान असलेल्या 5 खांबावरील लघू दाबाचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. 28 हजार रुपये किंमतीचे हे तार होते. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.
अज्ञाताविरोधात तक्रार दाखल
दहिगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचा कक्ष तथा उपकेंद्र आहे. या अंतर्गत मोहराळा शेत शिवार आहे. मोहराळा शेत शिवारातील सुरेश काशीराम पाटील यांचे शेत गट क्रमांक 272 पासून ते विजय भास्कर पाटील यांच्या शेत गट क्रमांक 475 दरम्यान विद्युत वितरण कंपनीने लघू दाबाचे पाच खांब टाकले होते. व त्यावर लघू दाबाचे तार टाकून शेतकर्यांना विद्युत कनेक्शन देण्यात आले होते. या पाचही खांबावरील लघू दाबाचे तार चोरी झाले. त्यांची किंमत 28 हजार रुपये आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता ललित पटेल यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द विद्युत तारांचे नुकसान झाल्याची तक्रार यावल पोलीस ठाण्यात नोंदवली.

