दोन दुचाकींच्या अपघातात वरणगावातील तरुणाचा मृत्यू
भुसावळ : भरधाव दुचाकींमध्ये धडक झाल्यानंतर झालेल्या अपघातात वरणगावातील 36 वर्षीय तरुण ठार झलाा. हा अपघात भुसावळ तालुक्यातील कपील नगराजवळ घडली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला एका दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दादाराव नारायण जमधाडे (36, मूळ रा.मन्यारखेडा व ह.मु.वामन गुरुजी नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
दीपनगरात कंत्राटी कामावर असलेला दादाराव जमधाडे हा तरुण शनिवार, 20 रोजी दुपारी 4 ते 12 वेळेत काम करून सुट्टी झाल्यानंतर रात्री घरी वरणगावकडे दुचाकी (एम.एच.19 ए.एच. 4739) ने जात असताना राँग साईडने संशयीत साजीद अहमद (पूर्ण नाव माहित नाही) हा दुचाकी (एम.एच.19 डी.ए.7926) आला व त्याच्या दुचाकीची धडक बसल्याने दोन्ही दुचाकीस्वार जमिनीवर कोसळले. या अपघातात दादाराव जमधाडे याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने त्यास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरानी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला दीपक नारायण जमदाडे यांच्या फिर्यादीवरुन साजीद अहमद (पुर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

