भुसावळातील कोच रेस्टॉरंटच्या जागेवर उद्यान उभारणीची मागणी
रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक पिंटू कोठारींचा प्रस्ताव
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर होणार असलेले कोच रेस्टॉरंट आता होत नसल्याने त्या जागेचा उपयोग हा उद्यानासाठी करावा जेणेकरून जंक्शनची शोभा वाढेल. तेथे सेल्फि पॉइंट तयार करावा, असा प्रस्ताव माजी नगरसेवक तथा स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य निर्मल कोठारी यांनी रविवारी झालेल्या बैठकीत मांडला. यावेळी चार सदस्यांची उपस्थिती होती.
स्टेशन मॅनेजर यांच्या दालनात बैठक
भुसावळ रेल्वे स्थानकावरील स्टेशन मॅनेजर यांच्या दालनात रविवारी दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.बी.तपस्वी, स्टेशन मॅनेजर पी.एस. भालेराव, वाणिज्य निरीक्षक प्रमोद सांळुंखे, सीएनडब्ल्यूचे नरोत्तमसिंग, रवींद्र त्रिवेदी, ज्ञानेद्र गुप्ता तर सल्लागार समितीचे सदस्य निर्मल कोठारी, अशोक चौधरी (आऊ), मुकेश गुंजाळ उपस्थित होते.

उद्यानाची निर्मिती झाल्यास स्थानकाच्या सौंदर्यात भर
यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेत माजी नगरसेवक कोठारी यांनी स्टेशनच्या बाहेर होणार असलेला कोच रेस्टॉरंट आता होणार नसल्याने ती जागा तशीच पडून आहे. यामुळे या जागेवर बगीचाचे निर्माण करावे, तेथे सेल्फी पॉईंट ठेवावा, जेणेकरून रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भरत पडेल तसेच रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असते, ती स्वच्छता करावी, कचरा कुंडी सुस्थितीत करावी, तसेच रेल्वे प्रशासनाकडून टिंबर मार्केट ते रेल्वे स्थानकापर्यतचा रस्ता बंद केल्याने प्रशासनाने कुठे तरी एक मार्ग काढून घ्यावा, जेणे करून रेल्वे लाईनीवर जर एखादा प्रवासी पडून जखमी झाला तर त्याला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळेल. रुग्णाला हॉस्पीटलला नेण्यासाठी स्टेशनवर न जाता रेल्वे लाईनीवरून तत्काळ शहरात नेता येईल यासाठी ही सुविधा द्यावी, अशी मागणी सुध्दा कोठारी यांनी केली. यावेळी सदस्यांनी ओळखपत्राची मागणी केली.




