रावेर पोलिसांनी कत्तलीपूर्वीच केली 52 गुरांची सुटका
कंटेनर जप्त : हरियाणातील संशयीताला अटक
रावेर : गुरे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना दाटीदाटीने कोंबून अवैधरित्या गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असताना रावेर पोलिसांनी कंटेनर जप्त करीत 52 मुर्हा जातीचे पारडूची सुटका केली. कंटेनरसह 15 लाख 20 हजारांचा मुद्देमाल कुसुंबा येथे जप्त करण्यात आला. हरियाणातील चालकाला अटक करण्यात आली असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मध्यप्रदेशातील खरगोनकडून पालमार्गे गुरांनी भरलेला कंटेनर येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, सचिन घुगे, राहूल परदेशी, महेश मोगरे यांच्या पथकाने कुसुंबा-पाल फाट्यावर कंटेनर (क्रमांक केए 01 एएन 5028) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात पाच लाख 20 हजार रुपयाचे काळ्या रंगाचे 51 नर व एकमादी असे 52 मुर्हा जातीचे पारडू आढळले.

गुरे वाहतुकीचा परवाना नसल्याने दहा लाख रुपयांचा कंटेनर जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी रुबाब तडवी यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक मोहंमद बिलाल अयुब (रा.हिंमतपट्टी रिठ्ठ, ता.फिरोजपुर, जि.नुह, हरियाणा) यास अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.
