सावखेडासीम सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपहाराचा ठपका

34 लाख रुपये वसूल करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस


यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांमध्ये अपहार झाल्याची तक्रार होती व या तक्रारीच्या चौकशीकरिता विशेष समिती नेमण्यात नेमण्यात आली. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांनी 34 लाख 86 हजार 853 रुपयाच्या अनियमिततेसह अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. शुक्रवारी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांना गटविकास अधिकारी यांनी ही रक्कम वसूल का करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अपहाराचा ठपका
सावखेडासीम, ता.यावल या ग्रामपंचायतीच्या विकासकामात अपहार झाल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील यांनी 20 सप्टेंबर 2023 व सावखेडासीम येथील साक्षी ठकसेन यांनी 11 ऑगष्ट 2023 केली होती. या संपूर्ण कामकाजाची चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने नुकतेच पंचायत समितीकडे आपला चौकशी अहवाल सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने विविध 10 कामांमध्ये गैरव्यवहारासह अनियमितता व अपहाराचा ठपका ठेवण्यात आला. एकूण 34 लाख 86 हजार 853 रुपये इतकी रक्कम सरपंच बेबीबाई विकास पाटील तसेच तत्कालीन ग्रामसेवक सोनाली अरुण सोनवणे यांच्याकडून 50-50 टक्के का वसूल केली जाऊ नये ? असे नमूद करीत दोघांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली. विविध 10 कामांमध्ये अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालातून ठेवण्यात आला आणि ही रक्कम वसुली संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावल्याने यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षात वसुली करून गुन्हे दाखल करावे
अपहार झाल्याची तक्रार केल्यानंतर पुरावे दिले व त्या अनुशंगाने चौकशी झाली मात्र केवळ नोटीस बजावणी करीत कागदोपत्री कारवाईपेक्षा प्रत्यक्षात वसुली व्हावी व गुन्हे दाखल करण्यात यावे व यावल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत हीच स्थिती असून पंचायत समितीतून पाठराखण केली जाते का ? असा संशय असल्याचे पंचायत समिती माजी गटनेता व तक्रारदार शेखर पाटील म्हणाले.

या 10 कामात अपहारचा ठपका
एलईडी बल्ब खरेदी चार लाख 99 हजार 986, रेन वॉटर हार्वेस्टिंग दोन लाख 97 हजार 983, संरक्षण भिंत बांधकाम पाच लाख 90 हजार 262, महिलांना प्रशिक्षणासह विविध योजनांवर चार लाख 95 हजार, भूमिगत गटार बांधकाम चार लाख 82 हजार 887, पेव्हर ब्लॉक बसवणे चार लाख 87 हजार, भूमिगत गटार पाच लाख 44 हजार 757, जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड चार लाख 79 हजार 213, पाणीपुरवठा व वॉल कंपाऊंड 10 लाख 09 हजार 115, रस्ता काँक्रिटीकरण चार लाख 83 हजार 901.

दोघांचे म्हणणे ऐकूण कारवाई होणार
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला व त्यात अनियमितता सह संशयीत अपहार झाल्याचे नमूद आहे. त्याअनुषंगाने तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांना 34 लाख 86 हजार 853 रुपयाचे दोघांकडून निम्मे-निम्मे का वसुल करू नये म्हणुन नोटीस दिली आहे. दोघांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !