गुटख्याचे वाहन कारवाईविनाच सोडले : मुक्ताईनगरातील पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांचे निलंबन
Gutkha’s vehicle left without action: Suspension of five persons including sub-inspector of police in Muktainagar मुक्ताईनगर (9 ऑगस्ट 2024) : गुटख्याचे वाहन पकडल्यानतंर कारवाई न करता सोडून दिल्याचा गंभीर प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात नुकताच घडला होता. याप्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर विशेष महानिरीक्षकांच्या आदेशानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व अन्य चार कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदारांनी पकडले होते वाहन
राज्यात गुटख्यावर बंदी असलीतरी शेजारच्या मध्यप्रदेशात मात्र गुटखा सहज उपलब्ध असल्याने त्याची महाराष्ट्रात तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. गत आठवड्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडून दिल्यामुळे हा प्रकार अजून चर्चेत आला होता. या संदर्भात आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत वरीष्ठ स्तरावर तक्रारीही केल्या होतय.

महानिरीक्षकांच्या आदेशानंतर निलंबन
काही दिवसांपूर्वी गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या एका वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली व हे वाहन पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न करता हे वाहन सोडून देण्यात आले. विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्यासह हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी व निखील नारखेडे तसेच नाईक सुरेश पाटील यांना निलंबित करण्यात आले.
मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, गुटखा तस्करी प्रकरणात थेट पीएसआयसह चार पोलीस कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
