साकरी येथील शेतमजुराचा शेत-शिवारात मृत्यू
भुसावळ (12 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील साकरी येथील शेत-मजूर शेत-शिवारात अत्यवस्थ अवस्थेत आढळल्याने त्यास ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शनिवार, 10 ऑग्स्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कैलास चिंधू तायडे (49) असे मयताचे नाव आहे.
कैलास तायडे हे व्यवसायाने हातमजूर होते. शनिवारी सकाळी चंद्रकांत राजधर मोरे यांच्या साकरी शिवारातील शेत गट क्रमांक 136 मध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने तातडीने त्यांना ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत शेतमजुराच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शनिवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

