दहिगाव गावातील चौकात वाळू चोरी करून नेताना ट्रॅक्टर पकडले


यावल (11 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील दहिगाव या गावात दहिगाव सावखेडासीम रस्त्यावर गावातील बसस्थानकाजवळ एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून एक जण वाळू चोरी करून नेत होता. याची माहिती यावल पोलिसांना मिळताच पोलिसांच्या पथकाने ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा एकूण पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

दहिगाव, ता.यावल या गावातून गुरूवारी रात्री दहिगाव सावखेडासीम रस्त्यावर बसस्थानक चौकात ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.18 बी.सी.6107) ला ट्रॉली जोडून किरण भगवान कोळी (शिरसाड, ता.यावल) हा वाळू चोरी करून नेत होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार अनिल साळुंखे, पोलिस नाईक वसीम तडवी हे पथकासह गेले व त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले व ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू मिळून पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार अनिल साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण कोळीविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !