यावल शहरातील वयोवृद्धेने उचलले टोकाचे पाऊल
यावल (25 ऑगस्ट 2024) : शहरातील धनगर वाड्यातील रहिवाशी 77 वर्षीय वृद्ध महिलेने म्हसोबा जवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली. महिलेस बाहेर काढल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यावल पोलिसात नोंद
यावल शहरातील धनगर वाड्यात अन्नपूर्णा भगवान बोरसे (77) ही वृद्ध महिला कुटुंबासह वास्तव्या होती. या वृद्धेवर मानसोपचार तज्ञ यांच्याकडे उपचार सुरू होते. शनिवारी पहाटे वृद्धा घराच्या बाहेर गेली आणि म्हसोबा जवळील विहिरीत त्यांनी उडी घेतली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संतोष बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

