चितोडा शेत-शिवारात 35 वर्षीय तरुणाला सर्पदंश
यावल (30 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील चितोडा शेत- शिवारात सातोद येथील 35 वर्षीय तरुणाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले असून तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तरुणाची प्रकृती स्थिर
सातोद गावातील बाळू कोळी (35) हा तरुण चितोडा शेत-शिवारात केळीच्या शेतात केळीचे खोडं आणि पत्ती फेकण्याचे काम करत असताना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास काम करताना त्याच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार त्याच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर डॉ.कोमल नरवाडे-पाटील, अधिपरिचारिका आरती कोल्हे, सुमन राऊत, अमोल अडकमोल यांनी उपचार केले. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. सर्पदंश झाल्यास तातडीने उपचाराकरिता रुग्णांना रुग्णालयातच दाखल करावे, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

