संतापजनक ! : रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार
सावदा (1 सप्टेंबर 2024) रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. नराधमांवर कठोर कारवाईची मागणी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्या पीडीतेला आरोपींनी सावदा येथे सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर एका शेतात अत्याचार केला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर अल्पवयीना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.
दोन आरोपींना अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावद्याचे एपीआय विशाल पाटील, पोलिस उपनिरिक्षक अमोल गर्जे यांनी दोन संशयित आरोपींना व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर बाल लैंगिक संरक्षण कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीला बालन्यायालय व इतर दोन संशयित आरोपींना सत्र न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.

