चहार्डीच्या तरुणावर चाकूहल्ला : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
Chahardi youth stabbed : Accused four days in police custody यावल (3 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील आडगाव जवळील श्री क्षेत्र मनुदेवी रस्त्यावर शनी मंदिराजवळील गार्डनच्या पुढे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून 21 वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली. तिघांना सोमवारी भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हल्ल्यात जखमी तरुणावर शस्त्रक्रीया करण्यात आली मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे.
धक्का लागल्याच्या वादातून मारला चाकू
सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरून शनिवारी दर्शन घेवून प्रशांत किशोर धनगर (21, रा.चहार्डी, ता.चोपडा) हा तरुण घरी जात असताना शनी मंदिराजवळील फॉरेस्टच्या गार्डन समोर दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी. यु. 6913) संशयीत वरील चेतन संभाजी सोनवणे (20, रा.खेडी ता.जळगाव), खुशाल शत्रुध्न कोळी (21ा रा.पंढरपूर नगर, एमआयडीसी, जळगाव) व सुरज नाना पाटील (20, रा.कुसंबा, ता.जळगाव) या तिघांनी वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने धारदार चाकूने प्रशांत धनगर यांच्या पोटावर वार केला. यामध्ये प्रशांत हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. या हल्ल्यानंतर दुचाकी वरील हे तिघे तरुण तेथून पसार झाले. या प्रकरणी विवेक धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक जगदाळे, हवालदार गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, योगेश बारी, शांताराम पाटील यांच्या मदतीने पकडण्यात आले. तिघांना सोमवारी भुसावळ येथील न्यायालयात न्या.एस.व्ही. जंगमस्वामी यांच्यासमोर हजर केले असता तिघांना 5 सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,हवालदार सागर कोळी करीत आहे.

घटनास्थळाचा केला पंचनामा
तिघे संशयीत 20 व 21 वयोगटातील असून किरकोळ कारणावरून हा गुन्हा घडला. घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक सोपान गोरेसह पथकाने जावुन पंचनामा केला.
