रावेर तालुक्यात वीज पडून शेतमजूरासह पाच जण जखमी
Five people including a farm laborer were injured due to lightning in Raver taluka रावेर (3 सप्टेंबर 2024) : रावेर तालुक्यातील दोधे गावात वीज पडल्याने पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्यप्रदेशातील बर्हाणपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींना बर्हाणपूरला हलवले
वीज पडल्याने मीराबाई प्रताप जमरे (30), पूजा प्रताप जमरे (13), रेखाबाई रावत (30), कालू रावत (30) व ज्योती चंद्रसिंग रावत (32) या जखमी झाल्या आहेत. जखमी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून मोल-मजुरीसाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते. या कुटूंबाने तापी नदीकाठालगत झोपड्या उभारल्या होत्या व तेथे त्यांचे तात्पुरते वास्तव्य होते. मंगळवारी सकाळी कुटूंब झोपडीत असताना अचानक विजांचा गडगडाट सुरू असताना वीज कोसळली. जखमींवर प्राथमिक उपचारानंतर त्यांना मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी जखमीना रुणालयात दाखल केले.

