वरणगाव फॅक्टरीतील सुपरवायझरच्या हत्येमागे आले ‘हे’ धक्कादायक कारण : आरोपी भावाला बेड्या

संशयीत वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील एके- 47 काडतूस चोरी प्रकरणातील आरोपी


‘This’ is a shocking reason behind the murder of the supervisor in the Varangaon factory : the accused brother was shackled भुसावळ (12 सप्टेंबर 2024) : वरणगाव ऑर्डनन्समध्ये सुपरवायझर पदावर असलेल्या 48 वर्षीय इसमाची सख्या भावानेच डोक्यात बॅट टाकून हत्या केली होती. पोलिसांच्या तपासात या हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे. मयताला प्लॉट घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये दिल्यानंतर ते परत न केल्याने झालेल्या वादानंतर ही हत्या घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खुनाची घटना बुधवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप जयसिंग इंगळे (48) असे मयताचे नाव तर सतीश जयसिंग इंगळे असे अटकेतील आरोपी भावाचे नाव आहे. विशेष म्हणजे सतीश इंगळे याच्याविरोधात वरणगाव ऑर्डनन्समधील एके 47 चे काडतूस चोरी प्रकरणात गुन्हादेखील दाखल होता.

आर्थिक वादातून केली हत्या
वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक 44 टाईप थ्रीमध्ये प्रदीप जयसिंग इंगळे हे वास्तव्यास होते व वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर नोकरीवर होते. बुधवारी ते ड्युटीवर गेले व दुपारी ते जेवणासाठी घरी आल्यानंतर भाऊ सतीश इंगळे यांच्यासोबत वाद झाला. यावेळी लाकडी बॅट डोक्यात मारल्याने व घाव वर्मी बसल्याने प्रदीप इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्लॉटच्या वादातून भावाची हत्या
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तुकाराम नगरात तीन हजार चारशे स्वेअर फूट प्लॉट सतीश इंगळे यांनी घेतला होता व त्यातील एक हजार स्वेअर फूट प्लॉट मयत प्रदीप इंगळे यांच्यासाठी घेण्यात आला व त्यासाठी साडेपाच लाख रुपये सतीश यांनी त्यावेळी दिले होते व ते परत मागण्यावरून बुधवारी दोघा भावांमध्ये वाद झाला व त्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा कयास आहे.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती कळताच भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वरणगावचे सहा.निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी धाव घेतली.

आरोपीविरोधात काडतूस चोरीचा गुन्हा
खून प्रकरणातील आरोपी तथा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील गुणवत्ता आश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश जयसिंग इंगळे यास एके- 47 रायफलीत वापरलेले जाणारे पाच जिवंत काडतूस चोरताना सतर्क सुरक्षा रक्षकांनी अटक 26 जून 2024 रोजी पकडले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !