प्रेमविवाह केलेल्या पत्नीस घरात लपवल्याच्या संशयावरून यावलला सासर्यास मारहाण : तरुणाविरोधात गुन्हा
यावल (12 सप्टेंबर 2024) : शहरातील सुंदर नगरी भागात प्रेम विवाह केलेल्या तरुणीस तिच्या 53 वर्षीय वडीलांनी घरात लपवुन ठेवल्याच्या संशयावरून एका तरूणाने त्यांच्याशी वाद घातला व आरडाओरड करत माझ्या पत्नीला घरात लपवून ठेवले असल्याचे सांगत लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व तलवारीने कापून टाकेल अशी धमकी दिली. ही घटना 9 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
यावल शहरात सुंदर नगरीत प्रल्हाद बंडू सावळे (53) हे आपल्या घरी होते. त्यांच्या मुलीने प्रेमविवाह केला असून ज्या तरुणाशी प्रेम विवाह केलेला आहे तो तरुण आकाश पांडुरंग शिंदे हा दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री सावळे यांच्या घरी आला व माझ्या पत्नीला तुम्ही तुमच्या घरात कोंडून ठेवले आहे. माझी पत्नी कुठे आहे तिला बोलवा, असे सांगत त्याने प्रल्हाद सावळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली. तुम्ही माझ्या संसारात दखल देत आहात. तुम्ही जास्त दखल दिली तर तुम्हाला तलवारीने कापून टाकेल, अशी धमकी या तरुणाने साळवे यांनी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात प्रल्हाद सावळे यांनी यांच्या फिर्यादीवरून आकाश शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

