केंद्रासह राज्यात तुमचे सरकार ; जलपूजनानंतरही छत्रपतींचे स्मारक का झाले नाही ? माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
मुंबई (06 ऑक्टोबर 2024) : केंद्रासह राज्यात तुमचे सरकार आहे मात्र ; जलपूजनानंतरही छत्रपतींचे स्मारक का नाही ? असा संतप्त सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. संभाजीराजेंनी ‘आज चला शिवस्मारक शोधायला’ हे आंदोलन छेडले. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा ताफा पोलिसांनी अडवत कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संभाजीराजेंनी तीव्र संताप व्यक्त केला.
समुद्रात केली पाहणी मात्र जागा सापडली नाही
सरकारने आठ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी समुद्रात पाहणी केली. पोलिसांकडून संभाजीराजे यांना दुर्बिणीतून शिवस्मारकाचे स्थान पाहण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार संभाजी राजे 50 कार्यकर्त्यांसह बोटीने स्मारकाच्या दिशेने जात दुर्बिणीने पाहणी केली.

मग का झालं नाही स्मारक
संभाजीराजे म्हणाले की, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यातही सरकार आहे. जलपूजन करुनही स्मारक का झालेलं नाही?, या पुतळ्यासाठी त्यावेळी देवेंद्र फडणवीस, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाविकास आघाडीतील सरकार काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मी याबाबत प्रश्न केला होता. यावेळी त्यांनी कोर्टाचं कारण दिलं होतं, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सरदार पटेलांचा पुतळा झाला पण शिवरायांचा पुतळा झाला नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे, मग स्मारक का होत नाही?, असा सवालही संभाजीराजेंनी केला. आता शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं काही चालणार नाही, जमत नसेल तर त्यांनी तसं सांगावं, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा : फडणवीस
स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण आणि ते कुणाचे वकील आहेत हे संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात संभाजीराजेंनी निषेध केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडत आहोत. आम्ही ते स्मारक कोर्टाकडून मंजूर करुन घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.




