भुसावळात कोळी समाज विकास मंडळातर्फे महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात
भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : शहरातील कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रदीप सपकाळे होतेे. त्यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. महर्षी वाल्मिकींनी श्रीरामाच्या जन्माआधी रामायणाची रचना आपल्या दिव्य दृष्टीतून केली. रामायणासारखा दिव्य ग्रंथ त्यांनी विश्वाला अर्पण केला. या ग्रंथाद्वारे नवसमाजाची निर्मिती बंधू प्रेम, एक पत्नी व्रत, पितृ आज्ञेचे पालन, सदाचाराची शिकवण त्यांनी सर्व मानव जातीला दिली. अशा थोर महात्म्याच्या जीवनाद्वारे मानव जातीला दिव्य प्रेरणा मिळते, असे सपकाळे यांनी सांगितले.
महर्षी वाल्मिकींची जगाला शिकवण
मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे म्हणाले की, आद्यकवी महर्षी वाल्मिकी हे कोळी बांधवांचेच आद्य दैवत असले तरी त्यांनी रामायणाची रचना ही फक्त कोळी बांधवांसाठी केली नसून त्यांनी या महान ग्रंथाद्वारे संपूर्ण जगाला शिकवण दिली आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कोळी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष नितीन सोनवणे, वसंत सपकाळे, शांताराम कोळी, भागवत सपकाळे, रवींद्र बाविस्कर, दीपक सोनवणे, संदीप कोळी, धर्मा कोळी, गोकुळ सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, महारु कोळी, दिलीप सोनवणे, कार्तिक सोनवणे आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले.





