महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन कर्मचार्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान
भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन कर्मचार्यांना त्यांच्या सतर्कतेबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि रेल्वेच्या सुरक्षित परिचालनासाठी केलेल्या तत्पर कार्यवाहीबद्दल ‘संरक्षा पुरस्कार’ देवून महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्याहस्ते 11 रोजी सन्मानीत करण्यात आले.
प्रसंगावधानाची रेल्वेकडून दखल
हे संरक्षा पुरस्कार कर्मचार्यांनी कर्तव्यावर असताना दाखवलेल्या प्रसंगावधान आणि समर्पणाची दखल घेऊन प्रदान करण्यात आले; या कृतींमुळे संभाव्य दुर्घटना टळल्या आणि प्रवासी व रेल्वे संचालनाची संरक्षा सुनिश्चित झाली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट संरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे.



पुरस्कार विजेत्यांचा तपशील
अरविंद कुमार साह (ट्रॅफिक इन्स्पेक्टर, खंडवा, भुसावळ विभाग)
22 जून 2026 रोजी गाडी क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना समजले की, बडगाव स्थानकाच्या अगदी पुढे रुळांवर झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. श्री. साहा यांनी असिस्टंट लोको पायलटच्या मदतीने रुळांवरील फांद्या हटवल्या. तसेच, आबना पुलावरील ‘अप’ मार्गावर एक लोखंडी खांब धोकादायक रित्या झुकलेला होता, ज्यामुळे रेल्वेच्या परीचालनावर विपरीत परिणाम होऊ शकला असता. साहा यांनी त्वरित संबंधित सर्वांना माहिती दिली आणि ही समस्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलली गेली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळले.
कमलेश कुमार (असिस्टंट लोको पायलट, भुसावळ)
12 जुलै 2026 रोजी मालगाडीवर कर्तव्यावर असताना, बीटीपीएस साइडिंगमध्ये प्रवेश करताना रुळाला तडा गेल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली तसेच पुढील कार्यवाहीसाठी संबंधित सर्वांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे एक दुर्घटना टळली.
राजेश रमेश पाटील (तंत्रज्ञ, आरओएच भुसावळ)
1 जुलै 2026 रोजी जळगाव स्थानकावर कर्तव्यावर असताना, ब्रेक ब्लॉक जाम झाल्यामुळे गाडी क्रमांक 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर एक्सप्रेस च्या ब्रेक व्हॅनमध्ये आग लागल्याचे पाहिले. पाटील यांनी त्वरित ब्रेकव्हॅनचा ‘’डीव्ही’ व्हॉल्व्ह रीलीज केला आणि सर्व कॉक्स बंद करून वेगळे केले. पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना सूचित केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
पुरस्कार देताना अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद,, इतर विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.