बालकांच्या हाती वाहने दिसल्यास पालकांना होणार शिक्षा : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (8 डिसेंबर 2024) : बहुतांश पालक आपल्या पाल्याचे वय 18 वर्ष झाले नसतानांही त्यांच्या हाती दुचाकी सोपवतात . परिणामी लहान बालकांच्या हातून अपघाताच्या घटना तसेच वाहतूकीच्या नियमांचे सर्रास उल्लघंन होत असल्याचे दिसून येते . यामध्ये सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व संस्था चालकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना सुचना देण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती दुचाकी वाहन दिसून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल,असेही आदेशात नमूद आहे.
परवाना नसल्यास होणार कारवाई
शाळेत शिकत असलेल्या बहुतांश पालक आपल्या पाल्याचे वय 18 वर्षे झाले नसतांनाही तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना त्यांच्या ताब्यात वाहने देवून शाळा, कोचिंग क्लासेस व इतर दैनंदिन कामासाठी पाठवतात . हि बाब बेजबाबदार तसेच बेकायदेशीर असल्याने लहान बालकांच्या हातून अपघाताची घटना किंवा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पालकांना दोषी धरले जाणार आहे . तसेच त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायद्यातील कलम 3, 4, 5, 180, 181 तसेच जेजे क्ट कलम 18 अशा विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत . यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन बालकांच्या हाती वाहने दिल्यास आता थेट त्यांना दंडात्मक कारवाईसह 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.

अशा पद्धतीचे आहेत आदेश
अल्पवयीन मुलांनी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवल्यास 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . तसेच चालक – मालक व पालकांना 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पण कायद्यात नमुद आहे . अपघात झाल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जातो . गुन्हा दाखल झाल्यास संबंधीत मुलांना कोणत्याही प्रकारची नोकरी, पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होवू शकते . दंडात्मक कारवाई झाल्यास संबंधीत मुला – मुलींना वयाच्या 25 वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना किंवा एक वर्षापर्यंत वाहन नोंदणी रद्द होवू शकते.
अल्पवयीन मुलांचा जिव धोक्यात घालू नये
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालकांना आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे वाहन देवून त्यांचा जिव धोक्यात घालु नये . अल्पवयीन मुलांना वाहन चालु देण्याऐवजी त्यांना सायकल, ई – सायकलचा पर्याय उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे .

