चोरीच्या तीन दुचाकींसह शिरपूरातील चोरटा जाळ्यात : अमळनेर पोलिसांची कामगिरी
Thief from Shirpur caught with three stolen bikes : Performance of Amalner police अमळनेर (9 डिसेंबर 2024) : तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरणार्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
विधानसभा निवडणूक काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर (34, क्रांतीनगर, शिरपूर) याने दुचाकी चोरली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आजूबाजूचे व शहरातील विविध रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना आढळून आलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तपासाधिकारी हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव यांच्या पथकाला रवाना केले. संतोष हटकर यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने तांत्रिक मु्द्यांच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली.

अमळनेर पोलीस स्टेशनला आल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने अमळनेर येथून चोरलेली मोटरसायकलसह बाहेरगावाहून चोरलेल्या दोन मोटरसायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. दरम्यान त्याच्याकडून आणखी अनेक चोर्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

