वकिलाकडून पाच हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर (27 मार्च 2025) : दस्त नोंदणीसाठी पाच हजारांची लाच वकिलाकडे मागून ती स्वीकारताना श्रींगोदा दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधकास अहिल्यानगरातील एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली. सचिन पांडुरंग खताळ, (38, साईराज अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 101, श्रीगोंदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
36 वर्षीय तक्रारदार वकील आहेत शिवाय ते जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी स्वतः व इतर 27 यांनी श्रीगोंदा येथील गट नंबर 1171 मधील 5 हेक्टर 68 आर क्षेत्रापैकी 28 आर जमीन विकत घेतली आहे. त्याचा दस्त 28 फेब्रुवारी 2025 रोजी केला होता. त्यानंतर 26 मार्च 2025 रोजी तक्रारदार तसेच त्यांचे पार्टनर यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक 1171 मधील 20 आर.क्षेत्रापैकी त्यांचे पार्टनर यांचे अविभाज्य हिश्याच्या पूर्ण विक्रीचे एक आर क्षेत्र दुसर्यांना 50 हजारात विक्री केल्याबाबतचा दस्त नोंदविण्याकरता तक्रारदार यांना दुय्यम निबंधक कार्यालयात देण्याकरता त्यांच्याकडे दिला होता. त्यावेळी तक्रारदाराने दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला. त्यावेळी खताळ यांनी आजच्या दस्ताचे पाच हजार व 28 फेब्रुवारी 2025 रोजी नोंदविलेल्या दस्ताचे 10 हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार बुधवार, 26 रोजी एसीबी अहिल्यानगरला दिली होती. त्याचदिवशी लाच पडताळणी करण्यात आली.

कार्यालयातच स्वीकारली लाच
आरोपी सचिन पांडुरंग खताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तक्रारदार यांना तुमच्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी दस्ताचे पैसे तुमचे पार्टनर देतील, आजच्या दस्ताचे बाबत सकाळी तुमच्याशी बोलणं झालं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणून लाचेची मागणी केली आहे. बुधवारी सायंकाळी दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी सचिन पांडुरंग खताळ यास पाच हजारांची लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने यशस्वी केला.