पोलिस ठाणे हाताळणे हे अनुभवासह कौशल्याचे काम : पोलीस निरीक्षक राहुल वाघ
रोटरी रेल सिटी तर्फे ’व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्ड’ वितरण उत्साहात

Rotary Rail City presents ‘Vocational Excellence Award’ amid excitement भुसावळ (15 मे 2025) : पोलिस ठाणे हाताळताना अनुभवा बरोबरच सद्सदविवेक बुध्दीने निर्णय घ्यावा लागतो. ते एक कौशल्याचे काम आहे तसेच कायद्याचा अभ्यास असणेही आवश्यक आहे. असे मत बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी व्यक्त केले. ते येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे आयोजित ‘व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्ड’ वितरण समारंभात बोलत होते.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, क्लबचे अध्यक्ष विशाल शाह, भावी अध्यक्ष देवा वाणी, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी, प्रोजेक्ट को-चेअरमन डॉ राहुल पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

पोलिस ठाण्यात प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना
निरीक्षक वाघ पुढे म्हणाले वडील एस.टी.महामंडळात कामाला होते घरची परिस्थिती बेताची होती. मी स्क्रीन पेंटिंग, फोटोग्राफी शिकत अर्थाजन केले. कायद्याचे शिक्षण पुर्ण झाल्यावर एक वर्ष वकीलीदेखील केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलिस खात्यात रुजु झालो. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आपल्याला न्याय मिळावा ही भावना असते. बर्याच वेळा दोन्ही बाजुच्या लोकांना माझेच म्हणणे योग्य आहे असे वाटते. अशा वेळी सद्सदविवेक बुध्दीने निर्णय घ्यावा लागतो, असे वाघ म्हणाले.
योग्य व्यक्तींचा सन्मान
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, आपल्या व्यवसायात उत्कृष्ट काम करणार्याची केलेली निवड योग्य व कौतुकास्पद आहे. अशा लोकांमुळेच शहराच्या लौकिक वाढण्यास मदत होते. असे सावकारे म्हणाल्या.
मान्यवरांच्या हस्ते शहरातील सात जणांना व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या व्यवसायात अनुकरणीय, प्रामाणिक व नैतिक सेवा देणार्यांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
हे मान्यवर पुरस्काराचे मानकरी
यंदा डॉ.सुरेंद्र भिरुड, डॉ.निलेश महाजन, रेल्वे अधिकारी संजय टोपरे, अॅड.सुरेश झारखंडे, अॅड.नितीन खरे, अभियंते विलास पाटील, पोलिस कर्मचारी किरण बाविस्कर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी पहेलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या व शत्रुशी लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ऑपरेशन सिंदुर यशस्वी केल्याबद्दल भारतीय लष्कर व सरकारचे अभिनंदन करणारा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजुर करण्यात आला.
प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. क्लबचे अध्यक्ष विशाल शाह पाहुण्यांचे स्वागत केले. प्रोजेक्ट को-चेअरमन डॉ राहुल पांडे व संदीप जोशी यांनी सुत्रसंचलन केले. देवा वाणी यांनी पाहुण्यांचा परिचय देत आभारही मानले.
