महिलेचा लग्नाला नकार ; संतप्त आरोपीने प्रियकरालाच संपवले
Woman Refuses Marriage ; Enraged Accused Kills Her Lover मुंबई (18 एप्रिल 2026) : लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेल्यानंतर संतप्त तरुणाने महिलेच्या प्रियकरालाच संपवत पळ काढला मात्र अवघ्या 60 तासात मुंबई पोलिसांनी आरोपी विमानाने पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास अटक केली. अभिनव कुमार असे खून झालेल्या तरुणाचे तर निरज कुमार विलास चौधरी (31) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
13 एप्रिल रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल परिसरात अभिनव कुमार या तरुणाच्या गळ्यावर वार करून त्याचा खून झाला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवताना मयत अभिनवचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण असल्याचे निष्पन्न केले व याच महिलेसोबत संशयीत आरोपी निरज चौधरीशी लग्न ठरल्यानंतर महिलेने आरोपी निरजसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपला विवाह मोडण्यास अभिनव कुमार जबाबदार असल्याचा संशय निरजला असल्याने या रागातून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवचा पाठलाग करीत त्याचा खून केला व पळ काढला.

विमान तळावरून आरोपी जाळ्यात
गुन्हा केल्यानंतर आरोपी निरज मुंबईतून पळून गेला होता. तो पकडला जाऊ नये म्हणून त्याने रेल्वेने अनेक ठिकाणी प्रवास केला. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तांत्रिक सर्व्हेलन्सचा वापर केला. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागपूर आणि कोलकाता येथे विशेष पथके रवाना केली.
कोलकाता एअरपोर्टवर थरारक कारवाई
आरोपी प्रथम रेल्वेने हावडा स्टेशनवर पोहोचला मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथूनही पळ काढला. शेवटी तो कोलकाता विमान तळावरून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तांत्रिक कौशल्य आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 60 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

