व्हीएसआरची विमाने म्हणजे उडते ‘डेथ ट्रॅप’ : आमदार रोहित पवारांचा खळबळजनक दावा
VSR’s Aircraft Are Flying ‘Death Traps’: MLA Rohit Pawar’s Sensational Claim बारामती (19 एप्रिल 2026) : व्हीएसआर कंपनीच्या विमानात अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात रोहित पवारांनी आघाडी उघडली आहे. या कंपनीची विमाने म्हणजे उडते ‘डेथ ट्रॅप’ असून, आता खुद्द कंपनीचे पायलट आणि कर्मचारीही या विमानात बसण्यास घाबरत आहेत, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे.
कंपनीची विमाने सदोष
व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप कंपनीचे कर्मचारी आणि पायलटने केला आहे. कंपनी कर्मचार्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असून, याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांनादेखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचार्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो.
व्ही. के. सिंग सरकारपेक्षाही वरचढ झाला का?
एकीकडे अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने व्हीएसआर कंपनीची 80 कोटींची बिलं अदा केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही व्हीएसआर कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय! अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.


