राज्यात विजेचा तुटवडा : थकबाकीदार ग्राहकांच्या मानगुटीवर भारनियमनाचा ‘भार’


Power Shortage in the State : The ‘Burden’ of Load Shedding Falls on Defaulters भुसावळ (20 एप्रिल 2026) : भुसावळसह राज्यभरात एप्रिलमध्ये उन्हाचा पारा 44 अंशावर गेल्यानंतर विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून आजमितीला राज्यात 800 ते 900 मेगावॅट विजेचा तुटवडा असून ही तूट भरून काढण्यासाठी वीज चोरी होणार्‍या तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या भागात भारनियमन केले जात आहे. महानिर्मिती, खाजगी वीज कंपन्या आणि केंद्रीय वीज केंद्रांकडून वीज खरेदी करूनही वीज तुटवड्याचे राज्यावर संकट आहे.

सायंकाळी तासभर भारनियमन
महावितरणला गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी 7 ते 8 या वेळेत आपत्कालीन भारनियमन करत असून ज्या निमशहरी वस्त्या किंवा ग्रामीण भागात विजेची चोरी आणि तांत्रिक गळती प्रचंड (साधारण 42% ते 58% पेक्षा अधिक) आहे तसेच वीज बिल वसुलीचे प्रमाण नीचांकी आहे, अशाच भागांचा या श्रेणीत समावेश होतो. यापूर्वी 13 एप्रिल रोजीही केवळ जी-3 फीडरवर सायंकाळी 6.48 ते 7.15 वाजेपर्यंत वीज कपात करण्यात आली होती.


दिवसा दिलासा, सायंकाळी तूट
सध्या दिवसाची विजेची गरज बर्‍याच अंशी सौर ऊर्जेवर भागवली जात आहे मात्र सायंकाळी सौरऊर्जा उपलब्ध नसल्याने व मागणी वाढत असल्याने ही तूट निर्माण होत आहे. शिवाय गॅसच्या टंचाईमुळे बहुतांश भागात विद्युत उपकरणांच्या वापरामुळेही तूट वाढली आहे.

भारनियमन तात्पुरता उपाय
ही भारनियमनाची स्थिती कायमस्वरूपी नाही. येत्या तीन-चार दिवसांत तापमानाचा पारा थोडा खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे विजेची मागणी घटेल आणि त्यानंतर कोणत्याही फीडरवर आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ येणार नाही, अशी अधिकृत माहिती महावितरण व महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !