भुसावळ वाढीव हद्दीतील नागरिकांना दिलासा : पाणीपुरवठ्याच्या वेळेत तीन तासांची वाढ

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तातडीचा निर्णय


Relief for Residents in Bhusawal’s Extended Limits : Water Supply Duration Increased by Three Hours भुसावळ (28 एप्रिल 2026) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, साकेगाव हद्दीतील आणि भुसावळ शहराबाहेरील वाढीव परिसरातील नागरिकांसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनंतर एमआयडीसी प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळेत तीन तासांची वाढ केली आहे. आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे.

माजी नगरसेवक दीपक धांडे यांचा यशस्वी पाठपुरावा
साकेगाव एमआयडीसीमार्फत साकेगाव शिवार, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, नारायण नगर, मोरेश्वर नगर, सीताराम नगर, महालक्ष्मी नगर, वरद विनायक कॉलनी आणि इतर वाढीव हद्दीत पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वी ही वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच होती. उन्हाळ्यात पाण्याची वाढती गरज पाहता, ही वेळ अपुरी पडत होती.
या समस्येचे गांभीर्य ओळखून शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी मागणी करून ही वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती.

प्रशासनाला मिळाले त्वरित आदेश
दीपक धांडे यांनी माहिती दिल्यानंतर नामदार गुलाबराव पाटील यांनी तातडीने जळगाव उपविभाग एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या. मंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2 वरून वाढवून सायंकाळी 5 वाजेपर्यंत केली आहे. या निर्णयामुळे कॉलनीवासीयामध्ये समाधानाचे वातावरण असून ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटल्याने नागरिकांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्र्यांकडून मागणीची दखल
वाढीव हद्दीतील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, ही आमची प्राथमिकता होती. पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्यामुळे हजारो नागरिकांना आता दिलासा मिळाला असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !