भुसावळात खंडित वीजपुरवठ्याने पाणीपुरवठ्याचे रोटेशन दोन दिवस लांबणीवर


भुसावळ (14 जून 2026) : गत आठवड्यात सलग खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन बिघडले. ते सुरळीत होत नाही, तोच शुक्रवार, 12 रोजी रात्री जलशुद्धीकरण केंद्रातून नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारा 120 अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झाला. सध्या केवळ 170 अश्वशक्तीच्या एकाच पंपावरुन जलकुंभात पाणीपुरवठा होत असल्याने जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी, दीनदयाळनगर यासोबत परिसरातील 40 हजार लोकसंख्येच्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तर सव्वा लाख लोकसंख्येच्या दक्षिण भागातील रोटेशनवर दोन दिवसांचा परिणाम होणार आहे

प्रभारी मुख्याधिकार्‍यांची अडचण
सध्या कायम मुख्याधिकारी नसल्याने पालिका वार्‍यावर आहे. प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. शहराच्या दक्षिण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी 120 व 170 एचपीचे दोन पंप आहेत. या दोन्ही पंपांना स्टँडबाय (पर्यायी) पंपही पालिकेकडे आहेत. पंप नादुरुस्त झाल्यानंतर तो तत्काळ दुरुस्त करुन ठेवणे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात 120 अश्वशक्तीचा पंप बिघडला होता. पण, दुसरा पंप नादुरुस्त होईपर्यंतही स्टँडबाय पंपांची दुरुस्ती झाली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी हे बराच काळ रजेवर होते.



शहरातील सर्वसामान्यच काय पण पालिकेच्या अधिकार्‍यांसोबत त्यांचा संपर्क नव्हता. जलशुद्धीकरण केंद्र व रॉ वॉटर पंपिंग हाऊसमध्ये ते पाय देखील ठेवत नाहीत. अधिकार्‍यांच्या अशा चालढकल कारभारामुळे सध्या शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.

तातडीने पंपाची दुरुस्ती
जलशुद्धीकरण केंद्रातील स्टँडबाय पंप महिन्यापासून नादुरुस्त आहे, याची माहिती अधिकार्‍यांनी देणे आवश्यक होते मात्र ही माहिती दिली गेली नाही. शुक्रवारी दुसरा पंपही बंद झाल्यानंतर ही बाब समोर आली. यानंतर आम्ही तातडीने दुरुस्ती सुरु केली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण होऊन शहराच्या दक्षिण भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. सध्या निर्माण झालेली अडचण सुटेल, असे भाजपाचे गटनेता युवराज लोणारी म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !