भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात


भुसावळ (15 जून 2026) : शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. नवीन वर्ग, नवे मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक आणि दप्तराचा सुगंध यामुळे मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद असतो. हा दिवस नवीन शैक्षणिक वर्षाच्या आणि आत्मविश्वासाच्या प्रवासाची सुरुवात करीत असल्याने या दिवसाचे औचित्य साधून भुसावळच्या के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार, 15 रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत
शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले व काही विद्यार्थ्यांना प्रातिनीधिक स्वरूपात रोपे देण्यात आली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तके वाटण्यात आली.

यांची होती उपस्थिती
शाळेच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल यांनी दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना व पालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन एस.पी.महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांची उपस्थिती लाभली.

शाळेच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.एस.ए.अडकमोल, शाळेचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, शाळेचे पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणकविभाग प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यालयाचे उपशिक्षक शैलेंद्र वासकर यांनी देशातील विविध घटक व शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे सर्वांना आवाहन केले. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !