महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या गळाला !


Political earthquake in Maharashtra: Six Thackeray MPs switch to Shinde’s camp! मुंबई (17 जून 2026) : राज्याच्या राजकारणात अत्यंत खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या घडामोडींना अधिक वजन मिळाले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दिल्ली दौर्‍यामुळे. दरम्यान, बुधवारी संबंधिताची बैठक होत असून या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करायचा की थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा ? यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.

उद्धव सेनेचे सहा खासदार वेगळ्या वाटेवर?
लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले तर स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते त्यामुळे 9 पैकी किमान सहा खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास या गटाला कायदेशीर वैधता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या खासदारांचा वेगळा गट होण्याची चर्चा
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर
यवतमाळचे खासदार संजय देशमुख
परभणीचे खासदार बंडू जाधव
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे
मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील

यांच्यासह काही खासदारांनी स्वतंत्र गटासाठी सहमती दर्शवली आहे. त्यापैकी काही खासदार आधीच दिल्लीत दाखल झाले असून उर्वरितही राजधानीत पोहोचले आहेत.

डॅमेज कंट्रोलसाठी राऊत-अरविंद सावंत दिल्लीत
या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनीही दिल्ली गाठली आहे. फुटीची शक्यता रोखण्यासाठी ते नाराज खासदारांशी संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे.

खासदार फोडण्यासाठी 15 कोटींची ऑफर
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर थेट आरोप करत, खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे, असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी कथित ऑपरेशन टायगरचा उल्लेख करत त्याला ऑपरेशन गिधाड असे संबोधले. सत्तेची भूक आता टोकाला पोहोचली असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दुसर्‍या पक्षात ओढून स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन गिधाड आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांची आघाडी सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही संस्थांवर आघात करत आहे, असा आरोप त्यांनी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !