ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांचा बंडाचा झेंडा : ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा


Six MPs from Thackeray’s Shiv Sena raise the banner of revolt; claim ‘Operation Tiger’ successful मुंबई (17 जून 2026) : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले असून त्यांनी बुधवारी सकाळी 9.30 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे. दरम्यान, ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आता विविध राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांवर खासदार संजय राऊत यांनी अत्यंत शेलक्या शब्दात टीपणी केली आहे.

ऑपरेशन टायगरबाबत सस्पेन्स व संभ्रम
दिल्लीत सुरू असलेल्या ’ऑपरेशन टायगर’बाबत राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी साथ सोडल्याची आणि त्यांनी सह्यांचे पत्र दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या बंडखोरीमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच्या बातम्याही झळकल्या मात्र प्रत्यक्षात या सहा खासदारांचा कोणताही एकत्र फोटो किंवा त्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र अद्याप समोर आलेले नाही, ज्यामुळे या दाव्यांबाबत साशंकता आहे.

दोन खासदारांनी पत्रावर सह्या केल्या नसल्याचा ठाकरे गटाचा विश्वास
या मुद्यावर बोट ठेवत सहापैकी दोन खासदारांनी पत्रावर सह्या केल्याच नसून ते अद्यापही आपल्यासोबत असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सहा खासदारांच्या सह्याच नसल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे.

चार वर्षात शिवसेनेत दुसर्‍यांदा फूट
गेल्या चार वर्षांतील शिवसेनेतील ही दुसरी फूट आहे. यापूर्वी, जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 39 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे गटाला पक्षाचे मूळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांनी या गटाला प्राथमिक मान्यता दिल्यानंतर उद्धवसेना नेतृत्वात खळबळ उडाली आहे. या घडामोडींची माहिती मिळताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने संसद भवनात धाव घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची 20 मिनिटे भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत व अनिल देसाईही सोबत होते.

ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी, राऊतांची मागणी
ठाकरे गटाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्र देत कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती. संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील अधिकृत पक्ष मानला जावा आणि कोणत्याही फुटीर गटाला विशेष दर्जा किंवा मान्यता देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. आता सहा खासदारांच्या गटाला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत स्वतः लोकसभा अध्यक्षांकडे उद्धवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे समजते.

तर जनता गप्पा बसणार नाही : राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी 50 कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच 15 कोटींचा अ‍ॅडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली, असे राऊत म्हणाले.

कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली..
खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची 14 तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने पाच वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसर्‍याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसर्‍याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !